छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही. राहुल आनंद निकम (वय ४७), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची कार दौलताबाद परिसरात आली. त्याचवेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट समोरून जात असलेल्या अज्ञात वाहनांना धडकली. हा अपघात इतका भीषण होता, की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातावेळी कारच्या एअरबँग उघडल्या. पण कुणाचाही जीव वाचला नाही. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवले आहेत.
समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका काही महिन्यांपासून खंडित झाली होती. मात्र, शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास महामार्गावर भीषण अपघात झाला होता. यामध्ये शिर्डीला दर्शनासाठी निघालेले ३ जण ठार झाले होते. शनिवारी (ता. १०) सलग दुसऱ्या दिवशी या महामार्गावर पुन्हा अपघात झाला. यामध्येही तिघांचा जागीच मृत्यू झाला.