छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
भोकरदन तालुक्यातील अन्वा गावातील धार्मिक उत्सवासाठी निघालेल्या उपळी येथील तीन मित्रांचा ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.०५) रात्री घडली. या अपघातामुळे संपूर्ण उपळी गावात शोककळा पसरली आहे.
यात समाधान अवचितराव आघाडे (वय 41), विकास रामभाऊ सोनवणे (वय 25), आणि काशिनाथ गोविंदा पांढरे (वय 45) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे मित्र उपळीहून अन्वा गावातील आजुबाई देवीच्या यात्रेसाठी मोटरसायकलवरून निघाले होते. सायंकाळी सहा वाजता ते निघाले, मात्र रात्री साडेआठच्या सुमारास लिहाखेडी फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत जोरदार धडक झाली.
या अपघातात समाधान आघाडे व विकास सोनवणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर काशिनाथ पांढरे यांना गंभीर जखमी अवस्थेत सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचीही प्राणज्योत मालवली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पोहोचवले. सध्या या अपघाताची नोंद अजिंठा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.