मुंबई वृत्तसंस्था : ठाकरे बंधूंच्या बहुचर्चित मुलाखतीनंतर मुंबईच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांची धग अधिकच वाढली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत टीका करत त्यांच्या मुंबईतील भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “दिवसभर सिनेमे पाहणे, घरच्यांसोबत फाफडा-जिलेबी खाणे आणि मित्रांसोबत गप्पा मारणे यापलीकडे ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी नेमके काय केले?” असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
मुंबईकर २६ जुलैच्या महापुरात अडकले असताना ठाकरे बंधू कुठे होते, असा सवाल उपस्थित करत शेलार म्हणाले, “त्या संकटाच्या काळात कोणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते, तर कोणी बंगल्यावर. हे दोघेही कधीच रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला आले नाहीत.” मुंबईच्या संकटात ठाकरे बंधू कधीच जनतेसोबत उभे राहिले नाहीत, असा आरोप करत त्यांनी मुंबईकरांनी आता त्यांची खरी ओळख ओळखली असल्याचा दावा केला.
शेलार पुढे म्हणाले, “२०१४ आणि २०१७ मध्येही या दोघांनी ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न केला, पण मुंबईकरांनी त्यांना झिडकारले. आजही हे भाऊ अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसले आहेत. ज्यांनी कधी मुंबईकरांचे दुःख पाहिले नाही, त्यांना आता मतदारही पाठिंबा देणार नाहीत.”
राज ठाकरे यांनी ‘भाजप मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करेल’ असा दावा केल्यावर शेलार यांनी त्याची खिल्ली उडवली. “मुलाखत देण्याआधी राज ठाकरे यांनी एखादी डॉक्युमेंट्री पाहिली असावी. जोवर सूर्य-चंद्र-तारे आहेत, तोवर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही. प्रश्न मुंबईचा नाही, तर ठाकरे कुटुंबाच्या पक्ष अस्तित्वाचा आहे,” असा टोला त्यांनी लगावला. शुभा राहुड ते संतोष धुरी यांसारखे नेते पक्ष सोडून जात असल्याचा उल्लेख करत शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वावर विश्वास उरलेला नाही, असा दावा केला.
राज ठाकरे यांनी ‘दिल्लीच्या आशीर्वादाने राज्यात सरकार बसवले’ या वक्तव्यावरही शेलार यांनी पलटवार केला. “तुमच्या घरातील व्यक्तीला, म्हणजे अमित ठाकरेंना, तुम्ही निवडणुकीत जिंकवू शकला नाहीत. ज्यांनी त्यांना घरी बसवले, त्यांच्याशीच आज तुम्ही हातमिळवणी करत आहात. आधी घरातील पराभवाचा हिशोब द्या,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर वैयक्तिक टीका केली.
ही निवडणूक ठाकरे कुटुंबाच्या अस्तित्वाची नसून मुंबईच्या विकासाची आहे, असा ठाम दावा करत शेलार म्हणाले, “मुंबईकर आता अहंकाराला स्थान देणार नाहीत. ही निवडणूक मराठी संस्कृती आणि विकासाची आहे. मुंबईची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”