ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे २२ जानेवारीला अयोध्येत नव्हे तर जाणार काळाराम मंदिरात !

मुंबई : वृत्तसंस्था

अयोध्येत प्रभू रामाची २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्याचे क्षण धार्मिक, अस्मितेचे, अभिमानाचे आणि आनंदाचे आहेत. यामध्ये कोणताही राजकीय रंग येऊ नये, याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संघर्ष केलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी स्पष्ट केले.

मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील पुतळ्याला ठाकरे कुटुंबीयांनी अभिवादन केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. अयोध्येतील राममंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमंत्रणावरून भाजप, शिवसेना (शिंदे) आणि उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली आहे. अद्याप निमंत्रण न पाठवत ठाकरेंना डिवचले जात आहे. याबाबत भूमिका मांडताना ठाकरे म्हणाले, २२ जानेवारीला अयोध्येला कोण जाणार, येणार यात मला पडायचे नाही. हा दिवस आमच्यासाठी अभिमानाचा अस्मितेचा दिवस आहे. प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम हा धार्मिक आणि अस्मितेचा असावा. याला राजकीय रंग येऊ नये. त्यामुळे २२ जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेऊन पंचवटीत गोदावरी नदीच्या तिरावर महाआरती करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!