मुंबई : वृत्तसंस्था
देशाच्या भवितव्यासाठी आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे आणि माझी नरेंद्र मोदींकडून त्याबाबत खूप अपेक्षा आहे. फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजप- शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला मी बिनशर्त पाठिंबा देत आहे, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात केली. मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही, असे जाहीर करतानाच त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागा, असे आदेश मनसैनिकांना दिले.
ते म्हणाले की, मी अमित शाह यांना दिल्लीत भेटलो, नंतर माझी शिंदे, फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. चर्चेत जागावाटप वगैरे विषय आला; पण मी त्यांना सांगून टाकले की, ही जागा पाहिजे ती पाहिजे याची चर्चा करण्याची माझी प्रवत्ती नाही.
भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे: पण इथे बेरोजगारी आहे. तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. आधुनिक शिक्षण मिळाले पाहिजे. त्यांना व्यवसाय करता आले पाहिजेत त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने काम करावे, अशी माझी पंतप्रधान मोदींकडून अपेक्षा आहे. त्यांनी तरुणांकडे लक्ष द्यावे, महाराष्ट्र जेवढा कर भरतो त्यातील योग्य वाटा महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, ही माझी अपेक्षा आहे. त्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी आपण महायुतीला पाठिंबा देत आहोत, असे ते म्हणाले, या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर विधानसभेत कोथळे बाहेर काढायला राज ठाकरे आहेच, असा इशाराही राज यांनी महायुतीला दिला.