मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील अनेक अडचणी वाढत असतांना आता देखील अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरुद्ध पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याच्या आरोपांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून घोषित केल्यानंतरही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून 50 कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तक्रारीत केला होता.
मुंबई पोलिसांच्या EOW ने देखील आयकर विभागाला पत्र लिहून UBT गटाचा कर कोण भरत आहे? याची माहिती मागितली आहे. मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात फसवणूक आणि बनावटगिरी केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले आहे की, उद्धव ठाकरे गट पक्षाच्या पॅन आणि टॅन तपशीलांचा गैरवापर करत आहे आणि शिवसेनेचे TDS आणि आयकर रिटर्न फसवणूक करत आहे.
गेल्या महिन्यात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका फेटाळण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाविरोधात शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात दोन्ही गटाने दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिका फेटाळल्या होत्या. “21 जून 2022 रोजी जेव्हा प्रतिस्पर्धी गट उदयास आला, तेव्हा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष होता” असा निर्णयही त्यांनी दिला आहे.
जून 2022 मध्ये, शिंदे आणि इतर शिवसेना आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले, ज्यामुळे सेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार पडले. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, भारताच्या निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षाचे धनुष्य-बाण चिन्ह वाटप केले, प्रत्यक्षात तो बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला मूळ पक्ष म्हणून ओळख मिळाली. डिसेंबर 2022 मध्ये, एका वेगळ्या प्रकरणात, EOW ने मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली की, त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांवर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याच्या आरोपांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.