ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवार गटाला मोठा धक्का; ठाणे महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत शरद पवार गटात दाखल

मुंबई प्रतिनिधी : राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला असून, पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा धक्का बसला असून, ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा मनिषा भगत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे.

मुंब्रा येथे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत मनिषा भगत यांनी शेकडो समर्थकांसह शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. मनिषा भगत यांनी 2023 मध्ये अजित पवार गटात प्रवेश केला होता आणि सध्या त्या ठाणे शहर महिला कार्याध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर त्यांचा पक्षप्रवेश हा अजित पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना मनिषा भगत यांनी सांगितले की, आमदार जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांचे नेतृत्व सर्वमान्य आहे. मुंब्रा परिसराच्या विकासात जितेंद्र आव्हाड यांचे मोठे योगदान आहे. मात्र काही लोक विकासाच्या कामांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत, ही बाब आपल्या मनाला पटत नसल्याने आपण विकासाच्या मार्गाने चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. या राजकीय घडामोडींमध्ये भाजपमध्ये सर्वाधिक ‘इनकमिंग’ होत असल्याचेही चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!