ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे ; सदाभाऊ खोत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. नुकतचं त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या शब्दांत टीका केली होती. यामुळे राजकीय वातावरण चांगलचं तापलं. त्यांनी केलेल्या विधानाचे पडसाद सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि इस्मालपूर परिसरातील उमटले. पडळकरांच्या वक्तव्यावर अनेकांकडून निषेध नोंदविण्यात आला आहे.

अशातच आता आमदार गोपीचंद पडळकरांचे जिवलग मित्र असलेल्या विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनाही जयंत पाटलांवर केलेली टीका खटकली आहे. खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी राजारामबापू यांच्याबद्दल असं वक्तव्य करायला नको होतं, असं खोत म्हणाले. आपली लढाई राजारामबापू यांच्याबरोबर नाही, तर त्यांच्या वारसांबरोबर असल्याचं खोत यांनी म्हटलं आहे. पुढे खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर हे प्रस्थापितांच्या विरोधात लढणारा नेता आहे, म्हणूनच त्यांना त्रास दिला जात आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर हे लंबी रेस का घोडा असल्याचं देखील सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

जयंत पाटील हे सांगलीच्या राजकारणातील दिग्गज नेते आहेत. विविध मंत्रिपदे सांभाळताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या वर्चस्वाला आव्हान मिळाले आणि याच काळात गोपीचंद पडळकर यांच्याशी त्यांचा वाद वाढला.

हा वाद आता वैयक्तिक पातळीवर गेला आहे. पडळकरांनी जयंत पाटलांना “बिनडोक” आणि “अक्कल नसलेला” असा उल्लेख करत त्यांच्या वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. “जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद वाटत नाही,” असे शब्द वापरत पडळकरांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी अत्यंत खालच्या शब्दांत केलेल्या टीकेमुळे राजकीय स्तर घसरल्याचं बोललं जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!