नाशिक : वृत्तसंस्था
सध्या चैत्रोत्स्वानिमित्ताने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रशासनाचे नियोजन फिस्कटले आहे. परिणामी, गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, भाविकांनी बुधवारी रात्रीपासूनच चैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर गर्दी सुरू झाली होती. गुरुवारी सकाळी या गर्दीत आणखी भर पडली. यामुळे गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरीसदृश्य स्थिती निर्माण झाली. भाविकांच्या या गर्दीमुळे मंदिर प्रशासन, पोलिस व आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्माचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. प्रशासनाने भाविकांना सुलभपणे आदिमायेचे दर्शन घेण्यासाठी दर्शन मार्गात बॅरिकेड्स लावले होते. पण काही ठिकाणी हे बॅरिकेड्स तुटले. यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्याचा फटका दर्शनासाठी आलेल्या लहान मुले व वयोवृद्धांना बसला.
या गर्दीमुळे भवानी चौकातील व्यापाऱ्यांचे व्यवहार पूर्णतः ठप्प झाले. या परिसरात कुठेही पाय ठेवायला जागा उरली नव्हती. उल्लेखनीय बाब म्हणजे सप्तश्रृंगी गडावर सध्या चैत्रोत्सव सुरू आहे गुढीपाडव्यापासून सुरू झालेला हा उत्सव हनुमान जयंतीपर्यंत चालतो. त्यामुळे मागील दोन-तीन दिवसांपासून येथे राज्यभराततून येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशानाने दोन-तीन बैठका घेतल्या. पण या बैठकांत घेण्यात आलेल्या निर्णयांची त्यांना योग्य पद्धतीने अंमलबजावणी करता आली नाही. त्यातून आजची चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती उद्भवली.
सप्तश्रृंगी गडाच्या पहिल्या पायरीजवळ भाविकांची मोठी गर्दी झाली. या ठिकाणी प्रशासनाने बॅरिकेड्स लावून गर्दीचे नियोजन करण्याचा प्रयत्न केला. पण गर्दीच एवढी होती की, हा प्रयत्न निष्फळ ठरला. भाविकांच्या मते, या ठिकाणी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची एक लाईन व दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची दुसरी लाईन करणे आवश्यक होते. विशेषतः शेजारच्या दुकानांपुढे होणाऱ्या गर्दीचेही स्वतंत्र नियोजन करणे आवश्यक होते. पण असे काहीच करण्यात आले नाही. त्यामुले ही चेंगराचेंगरीची स्थिती उद्भवली.
सप्तशृंगी देवी मंदिरातील चैत्री नवरात्रोत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. सप्तशृंगी मंदिरातील नवरात्रोत्सवाला रामनवमीपासून प्रारंभ होतो. साडेतीन शक्तिपीठांमध्ये अंतर्भाव असलेल्या आणि म्हणूनच सर्वज्ञात असलेल्या आणि खान्देशवासीयांचे कुलदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी हजारो नागरिक मोठ्या श्रध्देने येतात. हजारो खान्देशवासी भाविक रामनवमीचा उत्सव घरी साजरा करून दुसऱ्या दिवशी पदयात्रेला प्रारंभ करतात.