मुंबई वृत्तसंस्था : भाजपाचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभर आक्रमक प्रचाराच्या भूमिकेत आहेत. जाहीर सभा आणि थेट संवादाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या फडणवीसांनी आता महत्त्वाच्या शहरांमध्ये टॉक शो आणि मुलाखतींची मालिका सुरू केली आहे. ठाण्यानंतर छत्रपती संभाजीनगरात झालेल्या विशेष टॉक शोमध्ये त्यांनी शहराच्या विकासाबरोबरच राजकीय गणितांवरही स्पष्ट भूमिका मांडली.
संभाजीनगरातील आगामी निवडणुकीत यावेळी ‘बाण की खान’ या मुद्द्यावर लढत होणार का, असा सवाल उपस्थित झाला असतानाच फडणवीसांनी भाजपाचा स्पष्ट अजेंडा जाहीर केला. “ना बाण, ना खान; राखू भगव्याची शान,” असा नारा भाजपाचा असेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. याआधीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र असताना यावेळी मात्र भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) स्वतंत्रपणे निवडणूक लढवत आहेत.
युती तुटण्यामागचे कारण सांगताना फडणवीसांनी शिंदे गटातील अंतर्गत गटबाजीकडे बोट दाखवले. संभाजीनगरात युती टिकवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, पण शिवसेनेत दोन वेगवेगळी मते होती, असे त्यांनी स्पष्ट केले. “शिवसेना रोज नवा प्रस्ताव द्यायची. आमचे नेते वैतागायचे, पण मी त्यांना प्रयत्न सोडू नका, युती करायचीच आहे, असे सांगायचो. मात्र एक नेता प्रस्ताव मान्य करायचा, तर त्याच वेळी दुसरा नेता त्यात बदल सुचवायचा. असे चार-पाच वेळा झाले,” असा खुलासा फडणवीसांनी केला.
शिवसेनेतील या गटबाजीमुळे अखेर संभाजीनगरात युती टिकू शकली नाही, असे सांगत फडणवीसांनी भाजप स्वबळावर आणि स्पष्ट विचारसरणीसह निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले. त्यांच्या या विधानामुळे संभाजीनगरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.