मुंबई : वृत्तसंस्था
देशातील जम्मूमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांवरून ठाकरे गटाने गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे. ”जम्मूमध्ये सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे लष्कराच्या अधिकारी व जवानांचे रक्त रोजच सांडत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कधी लढून तर कधी लढण्याची संधीही न मिळता लष्कराच्या अधिकारी व जवानांना वीरमरण येत आहे. असे किती लष्करी अधिकारी व जवान आपण पुनः पुन्हा गमावणार आहोत? शहीद होणाऱ्या जवानांचे हे हौतात्म्य असले तरी सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालेल्या या हत्याच आहेत व त्याची लाज या सरकारला वाटायला हवी. जम्मूमधील वाढते दहशतवादी हल्ले व लष्करी अधिकारी, जवानांचे सलग सुरू असलेले लाजिरवाणे हत्यासत्र हे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचे अपयश आहे व नैतिकतेच्या मुद्दय़ावरून पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घ्यायलाच हवा!”, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
ठाकरे गटाने असे म्हंटले आहे की, देशात आजघडीला सरकार नावाची चीज अस्तित्वात आहे काय व असेल तर ती नेमकी काय करीत आहे? कालपर्यंत केवळ कश्मीर खोऱ्यापुरत्या सीमित असलेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आता जम्मूमध्ये रोजच धुमाकूळ चालवला असताना देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री व संरक्षणमंत्री काय करीत आहेत? देशातील राजकीय विरोधकांना दुश्मन मानून त्यांना संपवण्यात व कुबड्यांवरील पंगू सरकार वाचवण्यासाठीच सगळी शक्ती खर्च करण्यात सरकार मश्गुल असताना देशाचे खरेखुरे शत्रू मात्र मोकाट सुटले आहेत. सोमवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा लष्कराच्या जवानांवर भीषण हल्ला केला असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
तसेच सरकार देशाच्या दुश्मनांशी दोन हात करण्याऐवजी आपल्या राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत कसे करता येईल, यावरच आपली सगळी शक्ती खर्च करीत आहे. जम्मूमध्ये पुनः पुन्हा जवानांच्या रक्ताचा सडा पडत असताना देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांचे अस्तित्व कुठेच जाणवत नाही. निवडणुका मॅनेज करणे, काठावरचे बहुमत वाढवण्यासाठी नवनव्या योजना आखणे, खोकेशाहीच्या माध्यमातून व धाकदपटशा दाखवून विरोधी पक्षांची सरकारे पाडणे व त्यासाठी सरकारची सगळी ताकद पणाला लावणे, या नसत्या उद्योगांमध्येच सरकारचा सगळा वेळ आणि शक्ती खर्च होत आहे. राजकीय विरोधकांऐवजी देशाच्या खऱ्या दुश्मनांना खतम करण्यासाठी सरकारने ही ताकद लावली असती तर जम्मू-कश्मीरमध्ये सुरू असलेले जवानांचे हत्यासत्र हतबलपणे पाहण्याची वेळ आज आपल्यावर आली नसती असे ठाकरे गटाने म्हंटले आहे.