पुणे : वृत्तसंस्था
नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे राजकारणात देखील काही धाडसी प्रयोग होत असतात. आम्ही दीड वर्षांपूर्वी केलेल्या प्रयोगाची इतिहासात नोंद होईल. सत्ताबदलाचा पहिला अंक पार पडला. कारभाराचा दुसरा अंक सुरू असून निवडणूक निकालानंतर तिसरा अंक पार पडेल, अशी फटकेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी चिंचवड येथील १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात केली.
चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले की, नाट्य कलावंतांचा हा दिमाखदार सोहळा आयोजित केला आहे. कलेच्या क्षेत्रात एखादा उपक्रम दरवर्षी करत १०० वर्षे करणे, हे सोपे काम नाही.