मुंबई : वृत्तसंस्था
मालाड परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाने झेप्टो ॲपद्वारे युम्मो कंपनीचे 3 आईस्क्रीम पार्सल मागवले होते. जेव्हा त्यांनी एक आईस्क्रीम खाल्ले तेव्हा त्यांना मासाच्या तुकड्यासारखे काहीतरी असल्याचे जाणवले. यानंतर जेव्हा त्याने आइस्क्रीमवरील आवरण काढले तेव्हा त्यामध्ये मानवी बोट आढळून आले. आईस्क्रीममध्ये बोट सापडल्याने त्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला. याप्रकरणी त्यांनी मालाड पश्चिम येथील मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. त्यानंतर याचे पुणे कनेक्शन समोर आले.
मालाड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ते आईस्क्रीम जप्त केले. त्यानंतर आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट फॉरेन्सिकसाठी पाठवलं असून यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी कलम 272, 273, 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आईस्क्रीममध्ये बोट आले तरी कसे? याचा शोध घेण्यासाठी मालाड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरामध्ये छापा टाकण्यात आला. आईस्क्रीमची ही कंपनी हडपसर परिसरात आहे. त्यामुळे या कंपनीत हे बोट आले कुठून? याबाबत हडपसर पोलीस ठाण्याचे अधिकारी चौकशी करत आहेत.
दरम्यान, आईस्क्रीम खाताना फिर्यादीला आपल्या तोंडात काहीतरी गेल्याचं लक्षात आलं आणि त्याने तो तुकडा तोंडातून बाहेर काढला. तपासणी केली असता तो नख असलेला मांसाचा तुकडा असल्याचे आढळून आले. यानंतर तक्रारदाराने तत्काळ आईस्क्रीम कंपनी yummo.icecream या इन्स्टाग्रामवरील पेजवर तक्रार नोंदवली आणि कंपनीच्या कस्टमर केअरलाही माहिती दिली. आईस्क्रीममध्ये एक खिळाही सापडला. त्यामुळे या प्रकरणामुळे आता अन्न सुरक्षेचाही मोठा प्रश्न उभा राहिला आहे.