ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुंबई पालिकेच्या रणधुमाळीत सिनेसृष्टीची एन्ट्री! ही अभिनेत्री प्रचारात उतरली

मुंबई वृत्तसंस्था : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रत्येक राजकीय पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी ठरली असून, मुंबईवर आपलाच झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत.

जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी राजकीय पक्ष विविध मार्गांचा अवलंब करत असून, चर्चेत असलेल्या आणि प्रसिद्ध चेहऱ्यांना प्रचारात उतरवण्यावर भर दिला जात आहे. अशाच पार्श्वभूमीवर मुंबईत एक बडी सिनेतारका थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (ठाकरे गट)च्या उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या ठाकरे गटाच्या प्रचारात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर रवीना टंडनचे काही फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंमध्ये रवीना टंडन शिवसेना (ठाकरे गट)च्या उमेदवारासाठी प्रचार करताना स्पष्टपणे दिसत आहे. तिच्या गळ्यात पक्षचिन्ह असलेला रुमाल असून, ती मतदारांना ठाकरे गटाच्या उमेदवारालाच मतदान करण्याचे आवाहन करत आहे.

रवीनाच्या या भूमिकेमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, समर्थकांकडून तिच्या सहभागाचे स्वागत केले जात आहे. काही व्हिडीओ आणि छायाचित्रे सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत असून, प्रचाराला नवे ग्लॅमर मिळाल्याची चर्चा सुरू आहे.

सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार प्रचारात उतरल्याने निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची शक्यता असून, या स्टार प्रचाराचा मतदारांवर किती परिणाम होतो आणि अखेर मुंबईच्या पालिकेची बाजी कोण मारते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!