ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी समर्थ कारखान्याच्या गळीत हंगामाला डिसेंबर अखेर प्रारंभ ; कशी आहे तयारी पहा !

अक्कलकोट, दि.31 : स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन 2022-2023 चा गळीत हंगाम माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक संजीवकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केल्याप्रमाणे 40 टक्के काम पूर्ण होत असून डिसेंबर अखेर गळीतास प्रारंभ होईल अशी माहिती संचालक अप्पासाहेब पाटील यांनी दिली. ते गेल्या आठ वर्षापासून बंद असलेला स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना पुनश्च चालु करणेकामी सर्व ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्याने सध्यस्थितीतील कामाचा आढावा घेतल्यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीशी अप्पासाहेब पाटील बोलत होते.

अप्पासाहेब पाटील पुढे बोलताना म्हणाले, अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील हे कार्यस्थळावर ठाण मांडून आहेत. प्रत्येक विभागाची प्रत्यक्ष ठिकाणी जावून पाहणी करीत आहेत. यांत्रिक कामाला वेग आला असून सुमारे 300 हून अधिक कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. मिल विभाग, बगॅस कॅरिअर, बॉयलिंग हाऊस, ज्यूस हाऊस, बॉयलर हाऊस, बॉयलर साईड न्यू ट्युब वर्क, बॉयलर आतील भागातील पुर्णत्वास येत असलेले ट्यूब वर्क, बॉयलिंग हाऊस पंप आणि व्हॉल्व वर्क, शुगर एरिया, शुगर हाऊस, पॅकेजिंग यासह सिव्हील वर्क पत्रा वर्क आदी कामे प्रगतीपथावर असून 15 डिसेंबर 2022 दरम्यान ट्रायल घेण्याबाबतचा प्रयत्न त्या पध्दतीने कामकाज सुरु असल्याचे अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, नूतनीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर असून कारखाना सुरु करण्याकामी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री ना.अतुल सावे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (शिखर बँक) प्रशासक विद्याधर अनास्कर यांचे सहकार्य लाभत असून यांच्याकडून देखील कारखान्याच्या सुरु असलेल्या कामकाजाची आस्थेने चौकशी केली जात आहे.

पाटील म्हणाले, यंत्र सामुग्रीच्या दुरूस्ती करिता तंज्ञाना बोलावण्यात आलेले आहे. यामध्ये टीम नाशिक कार्यरत आहे. ऊस उत्पादक शेतकरी सभासदांना ऊस घालण्याकामी अडचण निर्माण होऊ नये, हक्काचा कारखाना असताना अन्य कारखान्याकडे ऊस जाण्याकरिता होणारी होरपळ थांबावी, त्यांना वेळेवर ऊस बिल अदा व्हावी या उदात्त हेतूने स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सुरू करण्याचा निर्धार अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी घेतल्याचे अप्पासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!