धुळे : वृत्तसंस्था
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील आदिवासी प्रकल्प विभागाच्या शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापिकेने चार हजारांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निवृत्ती शिक्षकाचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागितली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्पाच्या शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या पटांगणात निवृत्त शिक्षक राजेंद्र चौधरी (वय ५८, रा. आनंदनगर, दोंडाईचा) यांचे गटविमा रकमेचे बिल अदा करण्यासाठी मुख्याध्यापिका अर्चना बापूराव जगताप यांनी पाच हजार रुपयांची मागणी केली होती. गटविम्याच्या रकमेचे देयक बिल शिंदखेडा उपकोशागार कार्यालयात सादर करावयाचे होते. तडजोडीअंती चार हजार रुपयांची मागणी ठरली होती.
दरम्यान १ जानेवारीला लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा यांच्याकडे निवृत्त शिक्षक चौधरी यांनी तक्रार केली. त्यानुसार सापळा रचून १ जानेवारीला सायंकाळी सातच्या सुमारास अक्कलकोस आश्रमशाळेत मुलींच्या वसतिगृहासमोर पंचांसमोर चार हजार रुपयांची लाच मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी स्वीकारली. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या निरीक्षक रूपाली खांडवा यांनी ही कारवाई केली. दोंडाईचा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक रूपाली खांडवा पुढील तपास करीत आहेत.