मुंबई : वृत्तसंस्था
देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये यंदाचे वर्ष खूप महत्वाचे मानले जात आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. आज या सोहळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निमंत्रण आले. तसेच या सोहळ्याला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना मिळाले असून या सोहळ्यासाठी अयोध्येला जाण्याचे त्यांनी मान्य केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संपर्क प्रमुख अजय जोशी आणि विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त क्षेत्र संपर्कप्रमुख संजय ढवळीकर यांनी आज सकाळी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी येऊन त्यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी आमंत्रित केले.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना राज्यातही 18 ते 22 जानेवारी दरम्यान अनेक उपक्रम आयोजित करून हा क्षण एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा असे आवाहन तमाम शिवसैनिकांना आणि पक्ष पदाधिकाऱ्यांना शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.