मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असतांना आता वाहनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हि बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील ‘अटल सेतू’चे उद्घाटन होणार आहे.
या सागरी पुलामुळे नवी मुंबई ते मुंबई प्रवास सुसाट होणार आहे. अटल सेतू हा मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा देशातील सर्वात मोठा पूल आहे. या सेतूची लांबी तब्बल २१.८ किलोमीटर इतकी आहे. विशेष बाब म्हणजे, पुलावर एकूण सहा लेन तयार करण्यात आल्या आहेत. अटल सेतूच्या बांधकामासाठी एकूण १७ हजार ८४० कोटी रुपये इतका खर्च आल्याची माहिती आहे. नवी मुंबई ते मुंबई प्रवासाचे अंतर कमी वेळात गाठता यावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली अटल सेतू प्रकल्पाची पायाभरणी केली होती.
तब्बल ७ वर्ष या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून सेतू पूर्णपणे वाहतुकीसाठी तयार झाला आहे. अटल सेतूमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई ते नवी मुंबई अंतर अवघ्या २० मिनिटात पार करता येणार आहे. याआधी हे अंतर पार करण्यासाठी दोन तास लागत होते. पुलावर वाहनांची वेग मर्यादा १०० किमी प्रतितास ठेवण्यात आली आहे.