ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात

मैंदर्गी,चपळगावात झाले अनोखे स्वागत

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ संस्कारमय आणि आनंदी वातावरणात झाला. तालुक्यातील मैंदर्गी,वागदरी,चपळगाव सारख्या अनेक शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांनी भरगच्च वातावरणात करण्यात आले. प्रभातफेरी, गुलाब फुले, औक्षण, शैक्षणिक साहित्य वाटप, सेल्फी पॉईंट अशा उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या मनात शाळेविषयी उत्सुकता आणि प्रेम निर्माण केले.

मैंदर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलांची व मुलींची शाळा येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील इयत्ता १लीमध्ये प्रवेश घेतलेल्या नवागत विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून मिरवणूक काढत भव्य स्वागत केले. या कार्यक्रमाला आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.या उपक्रमाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यास मोठी मदत होते. अभ्यासाची गोडी त्यांच्यामध्ये वाढीस लागते. यासोबतच, ज्ञानार्जनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार देऊन सुसंस्कृत आणि सुशिक्षित करण्याचे आवाहन शिक्षकवर्गाला केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे, मुख्याध्यापक शिवचलप्पा हडलगी, विलास गव्हाणे, तुकप्पा नागुर, सुरेश नागूर,अनिल पाटील, दयानंद बमनळी, संजय मोरे, सिद्धाराम जकापुरे,लक्ष्मीपुत्र निंबाळ आदींची उपस्थिती होती.

वागदरी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.ध्येय बाळगा, शिक्षण घ्या,नक्की पुढे जाल,असा सकारात्मक संदेश विद्यार्थ्यांना देत त्यांनी शाळेतील उपक्रमांना सुरुवात केली.गावातून गुलाबफुले व फुगे हातात देत प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावर फुलांचा वर्षाव आणि कुंकू लावून औक्षण करून विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. शाळेच्या जमिनीवर डोके टेकवून विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणप्रवासाची सुरुवात केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवराज पाटील होते तर संतोष पोमाजी यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सेल्फी पॉईंटचे आयोजन अनुसया कलशेट्टी यांनी केले. तोलन बागवान यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. मनिषा कुणाळे यांनी आभार मानले.

चपळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेतही नवागतांचे स्वागत दिमाखदार वातावरणात झाले. ग्रामपंचायतीकडून सनई-चौघड्याच्या निनादात, फेटे घालून, हार देऊन प्रभातफेरी, तसेच शाळेतील पहिलं पाऊल कुंकुमठस्यांनी उमटवणे, शैक्षणिक साहित्य वाटप असे विविध उपक्रम राबविण्यात आले. सरपंच वर्षा भंडारकवठे, तहसीलदार विनायक मगर, अभियंता मनीषा बिडला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, चपळगाव यांसह अनेक शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात केवळ औपचारिक नव्हे, तर संस्कारक्षम आणि प्रेरणादायी पद्धतीने करत आदर्श निर्माण केला आहे. पालकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्यामुळे शाळा आणि समाज यामध्ये बळकट नाते तयार होत असल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!