पुणे : वृत्तसंस्था
राज्यात सध्या पावसाचे वातावरण व त्यात पंढरीचा गजर सुरु असल्याने राज्यात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. सासवड मुक्कामानंतर आता पालखी हळूहळू पंढरपूरकडे जात आहे. या दरम्यान पालखी सोहळा पाहण्यासाठी दिवे घाट परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवे घाट पार करत असतांना वरुणराजाने देखील हजेरी लावत माऊलीच्या पालखीचे जणू दर्शन घेतले. सायंकाळी साडेचार वाजता संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वैष्णवासमवेत दिवेघाटातून पुरंदर तालुक्यात आगमन झाले.
सासवड येथे मुक्कामी असलेल्या पालखीतील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पूजन सकाळी करण्यात आले. या वेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीबरोबरच संत सोपान काकांची पालखी देखील पंढरपूरकडे निघाली आहे. ही पालखी सासवड वरून जेजुरीच्या दिशेने निघाली.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत सुरू असलेला राज्य शासनाने घेतलेल्या विविध लोककल्याणकारी योजना, उपक्रम, अभियानाची माहिती देणारा संवादवारी उपक्रम वारकऱ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मनोरंजनातून शासकीय योजनांची जनजागृती आणि भव्य प्रदर्शन असा दुहेरी संगम साधणारा संवादवारी उपक्रम आहे. या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती चांगल्याप्रकारे मिळते, अशी प्रतिक्रिया पालखीतळाच्या ठिकाणी आयोजित प्रदर्शनाला भेट देणाऱ्या वारकऱ्यांनी व्यक्त केल्या.