पुणे : वृत्तसंस्था
टाळ मृदंगाचा नाद…ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष…अन् पावसाचा अखंड वर्षाव…अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले. ही पालखी आज पुण्यात पोहोचणार आहे.
प्रस्थान सोहळ्य़ाचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱयांनी प्रस्थान सोहळय़ाची वाट धरली आणि या जलधारांच्या साक्षीनेच सोहळा पार पडला. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती, गोपाळपुरा, विश्रांतवाड परिसर वारकऱयांनी दुमदुमून गेला. देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळाप्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, चैतन्य लोंढे, ऍड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम पाटील, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यावेळी उपस्थित होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 194 व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्य़ास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. काकडा, अभिषेक, महापूजा, पंचामृतपूजा, दुधारती करण्यात आली. दुपारी वीणामंडपात कीर्तन झाले. साडेतीन वाजेपर्यंत दर्शनबारी सुरु होती. सायंकाळी पाच ते सात दरम्यान माउलींची नित्य गुरुवारची पालखी मिरवणूक झाली. प्रस्थान सोहळय़ातील मानाच्या 47 दिंडय़ांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सर्व दिंडय़ा मंदिराला प्रदक्षिणा घालून पुढे पुढे सरकत होत्या. वीणा-टाळ-मृदंगाच्या गजराने माउली तुकारामांच्या जयघोषाने मंदिर व आजूबाजूचा परिसर भक्तिमय झाला होता. रात्री सातनंतर पालखी प्रस्थानाच्या मुख्य सोहळय़ाला सुरुवात झाली. श्रीगुरू हैबतबाबा यांच्यातर्फे श्रींची आरती झाली. त्यानंतर माउली संस्थानातर्फे श्रींची आरती झाली.
वैभवी चांदीच्या पादुका प्रस्थानासाठी पुष्पसजावटीने सजलेल्या चौथऱयावर वीणा मंडपात ठेवण्यात आल्या. चलपादुकांची विधिवत प्राणप्रति÷ा झाली. सर्वांच्या मुखी ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘माउली माउली’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा गजर सुरू होता. उत्तरोत्तर सोहळय़ाची रंगत वाढतच गेली. सोहळा सुरू असताना दिंडय़ांमधील भगवे ध्वज डौलाने फडकत होते. त्यानंतर माउलींचे मानाचे दोन अश्व मंदिरात आणण्यात आले. अश्वांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. अश्व महाद्वारातून बाहेर पडताच मंदिरातील दिंडय़ा मंदिराबाहेर सोडण्यास सुरुवात करण्यात आली. पालखी मंदिरातून बाहेर निघताच उपस्थित वारकरी, भक्तांनी एकच जल्लोष सुरू केला. पालखी खांद्यावर घेण्यासाठी वारकरी, भाविकांची झुंबड उडाली होती. या उत्साही वातावरणातच पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली आणि पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. शुक्रवारी सकाळी पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला.