ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यातील आपले सरकार सेवा केंद्रांचे सर्व्हर बंद 

नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

सध्या दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी लागणारे विविध सरकारी दाखले मिळविण्यासाठी नागरिक महा-ई-सेवा केंद्रांची दररोज धावपळ करत आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून “आपले सरकार सेवा केंद्राचे” सर्व्हर सतत बंद राहत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.दाखले – उत्पन्न, रहिवासी, नॉन-क्रिमिलिअर, जात प्रमाणपत्र तसेच प्रतिज्ञापत्र यांसारख्या कागदपत्रांची आवश्यकता विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी अनिवार्य असते. मात्र, सेवा केंद्रांवर सर्व्हर डाऊन आहे हेच उत्तर वारंवार दिले जात असल्याने विद्यार्थी व पालक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

नवीन शासकीय नियमानुसार एका सेवा केंद्रावर केवळ एका कॉम्प्युटरवरच दाखले काढण्यास परवानगी दिली गेली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक तास ताटकळत बसावे लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, यामुळे वेळेत दाखले न मिळाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाण्याची भीती केंद्र चालकांनी व्यक्त केली आहे.

अनेक नागरिकांची मागणी पूर्वीप्रमाणे तीन-चार कॉम्प्युटरवर दाखले काढण्याची सुविधा देण्यात यावी, जेणेकरून कामाचा वेग वाढेल आणि गर्दी कमी होईल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आधार केंद्रेही ठप्प स्थितीत शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट व मोबाईल क्रमांक लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, अक्कलकोट तालुक्यातील निम्म्याहून अधिक आधार केंद्रे बंद आहेत. याबाबत चौकशी केली असता, ऑपरेटर आयडी वेळेवर प्रशासनाकडून दिले जात नसल्यामुळे आधार सेवा केंद्र बंद असल्याचे समजते.

नागरिकांची प्रशासनाकडे मागणी

सर्व्हरची समस्या त्वरित सोडवून महा-ई-सेवा केंद्रांवर अधिक कॉम्प्युटरवर दाखले काढण्याची मुभा द्यावी. तसेच, आधार ऑपरेटरचे आयडी तातडीने उपलब्ध करून द्यावेत, जेणेकरून विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सेवा वेळेत व अडथळ्यांशिवाय मिळू शकतील, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!