ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रासायनिक खते, कोरोनाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री राज्य प्रशासनास सूचना करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती वधारल्याच्या माहितीने काही शेतकऱ्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याशी याविषयी चर्चा केली. या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात योग्य दरात खते उपलब्ध होतील असा विश्वास खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केला आहे.

खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याशी सोमवारी संवाद साधत रासायनिक खतांच्या किमती व सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. कोरोनामुळे नागरिक तर रासायनिक खतांच्या किमतींमुळे शेतकरी चिंतीत आहे. याबाबत नागरिकांना दिलासा मिळण्यासाठी लवकरात लवकर संबंधितांना सूचना देण्यासाठी खा.डॉ. महास्वामी यांनी केंद्रीय स्तरावर संवाद साधत मार्ग काढण्याच्या प्रयत्न केला आहे.

केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी सध्या, रासायनिक खतांच्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता संबंधित कंपन्यांना खतांचे दार पूर्वस्थितीत ठेवण्याबाबत आदेश देण्यात येतील. खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. आठवडाभरातच रासायनिक खतांच्या किमती पूर्ववत होतील असे खा.डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना सांगितले.

तसेच, सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.औषधे, वैद्यकीय साहित्यांअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. सोलापुरातील ग्रामीण भागातील रुग्णांना सोयीसुविधा देणे, वाढत असलेले मृत्यू दार कमी करण्यासाठी प्रभावी उपाय व अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी खा. डॉ. महास्वामी यांनी केंद्रीय मंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची मागणी केली. त्यावर केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी लवकरच रासायनिक खतांच्या किमती व सोलापूर जिल्ह्याच्या कोरोना परिस्थितीबाबत राज्य प्रशासनाबाबत आढावा घेत योग्य ते आदेश देण्याचे सांगितले आहे.

खा.डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी  केंद्रीय खाते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याशी दोन्ही विषयांवर केलेल्या चर्चेमुळे याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होतील. यातून संकटात असलेल्या नागरिकांना बसणारा आर्थिक फटका सहन करावा लागणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!