मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिण योजना राबविली होती मात्र आता ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींच्या मताचा वापर सत्तेसाठी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
रोहित पवारांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरू करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून उर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरू केला तर ते अधिक योग्य ठरेल.
नेमके रोहित पवार यांचे ट्विट काय?
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय की, ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने कपात करण्याचे या सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मताचा वापर या सरकारने केवळ निवडणुकीच्या राजकारणात करून घेतला, हेच यातून स्पष्ट होत आहे. या प्रवृत्तीला काय म्हणावं? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार म्हणाले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘मंदिर व्यवस्थापन’ या विषयाचा अभ्यासक्रम सुरु करण्याऐवजी कायम दुर्लक्षित ठेवलेल्या पैठण येथील संतपीठाला भरीव निधीच्या माध्यमातून उर्जितावस्था देऊन त्यांच्या अखत्यारित हा विषय सुरु केला तर ते अधिक योग्य ठरेल… इतर विद्यापीठांनी मात्र आपल्या कार्यकक्षेबाहेरील विषयांत नाक खुपसण्यापेक्षा ढासळणारी गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि आपली युवा पिढी जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी डेटा सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी, एआय यासांरखे बदलत्या तंत्रज्ञानाधारीत अभ्यासक्रम सुरु करुन विद्यापीठातून बाहेर पडणारी पिढी ही बेरोजगार न राहता त्यांना नोकऱ्या कशा मिळतील, याचा प्रयत्न करावा. तसेच विद्यापीठाने आपलं काम करताना विज्ञान आणि अध्यात्म याची गल्लत करु नये. राज्य सरकार आणि कुलपती महोदयांनीही यामध्ये लक्ष घालावे, ही विनंती!