मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विक्रमी 86 निर्णय घेण्यात आले. मागील दहा दिवसांपासून सरकारने निर्णयांचा धडाका लावला असून 1200 पेक्षा जास्त निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांवरुन विरोधकांकडून महायुती सरकारचा समाचार घेण्यात आहे. महायुती सरकारने निवडणुकांचा धसका घेतला असून काही मिनिटांत 86 निर्णय घेणे ही त्रिकूट सरकारची अगतिकता आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी केली आहे.
जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारकडून सुरू असलेल्या निर्णयांच्या धडाक्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकांचा धसका सत्ताधारी महायुतीने घेतलेला दिसतो. म्हणूनच ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे महायुती त्रिकुट सरकार वेगवेगळ्या घोषणा करताना दिसत आहे. पुन्हा सत्तेत येणार नसल्याची महायुतीला खात्री झाल्याने मनाला वाट्टेल त्या घोषणा करुन आश्वासने देत आहे. गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांतील विशेषतः कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत अवघ्या काही मिनिटांत घेतले गेलेले 86 निर्णय त्रिकुट सरकारची अगतिकता दर्शवत आहे, अशी खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.