मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीत जाण्यापूर्वी ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी सुरुवात करायचे. पण आता इंडिया आघाडीच्या सभेत ठाकरेंच्या भाषणात ‘हिंदू’ शब्द ऐकायला येत नाही. मतांची लाचारी करण्यासाठी उद्धव ठाकरे ‘व्होट जिहाद’ करा म्हणतात, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी – केली. आम्ही मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करत आहोत. – पण विरोधकांनी मुंबईसाठी केलेले एक काम सांगावे, असे आव्हानही फडणवीस यांनी यावेळी दिले.
ते म्हणाले, आम्ही अटल सेतू उभारला, कोस्टल रोड बांधला, मेट्रोची कामे वेगाने सुरू आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवणार आहोत. २०१४ मध्ये मी मुख्यमंत्री झालो तेव्हा गुजरात परकीय गुंतवणुकीत पहिल्या स्थानावर होता. पण पुढे माझ्या कार्यकाळात महाराष्ट्र ५ वर्षे पहिल्या स्थानावर होता. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा चौथ्या क्रमांकावर गेला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार आल्यानंतर थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला, असे सांगून फडणवीस पुढे म्हणाले, पण उद्धव ठाकरे सत्तेत असताना काय झाले तर वसुली. सचिन वाझेसारखा पोलीस अधिकारीच उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवू लागला. यावर ठाकरे म्हणाले, वाझे काय लादेन आहे का? आता भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळताच हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्यांना कसाबने मारले नसल्याचा काँग्रेसवाले बोलू लागले आहेत. देशात जेव्हा कोरोनासारखी महामारी सुरू झाली तेव्हा भारतातील ४०-५० कोटी लोक मरतील, असे जगातील लोक म्हणत होते. त्यावेळी चारच देशांनी कोविडची लस तयार केली होती. अशा वेळी मोदींनी देशातील शास्त्रज्ञांना एकत्र करून लस तयार करण्याचे आवाहन केले व मदत दिली. जेव्हा मोदी कोविडची लस देत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे काय करत होते तर येथे खिचडी घोटाळा, बॉडीबॅग, रेमडेसिवीर घोटाळा सुरू होता. मोदी जेव्हा सेवा करत होते तेव्हा आम्ही खिचडीचोर आणि कफनचोर पाहत होतो, असेही फडणवीस म्हणाले.