ध्यास विश्वसार्ह बातमीचा

१८ महिन्यात पूर्ण होणार ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिराचे काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देवस्थान समितीने ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर सर्वच कामांना गती आली असून विश्वस्त मंडळी यासाठी जोमाने काम करताना दिसत आहेत.अडीचशे वर्षाहून अधिक काळाचा इतिहास सांगणाऱ्यां मल्लिकार्जुन मंदिरात अक्कलकोटचे आराध्य दैवत श्री स्वामी समर्थ हे सन १८५६ साली ललित पंचमीला अक्कलकोट शहरात प्रवेश केले होते त्यांनी प्रथम बस स्थानकासमोरील खंडोबा मंदिर येथे मुक्काम केले नंतर लगतच असलेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. श्री स्वामी समर्थ हे सन १८५६ ते १८७८ म्हणजे २२ वर्षे अक्कलकोट शहरात वास्तव्यास होते.

या २२ वर्षाच्या कालावधीत वटवृक्ष देवस्थान, गुरु मंदिर, खासबागसह तालुक्यातील विविध गावांना भेटी देऊन विविध चमत्कार करत अनेकांना दारिद्र्य मुक्त केले.यात अनेक रोग्यांना रोगमुक्त देखील केले होते.श्री स्वामी समर्थांचा उगम आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे कर्दळी वनातून झाल्याचे अनेक साहित्यात ग्रंथात व बखरमध्ये उल्लेख असून श्री स्वामी समर्थांनी श्री मल्लिकार्जुनाना आपले दैवत मानत असल्यामुळे आपल्या बावीस वर्षाच्या वास्तव्य काळात दर सोमवारी न चुकता ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी जात होते.

त्यामुळे या मंदिराला वेगळे महत्व आहे.या जीर्णोद्धार कामासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे शिष्टमंडळ आंध्र व कर्नाटक प्रदेशातील विविध गावांना भेटी देऊन तेथे बांधण्यात आलेल्या दगडी बांधकामाचे मंदिराचे पाहणी करून अनेक कारागिराशी चर्चा व सल्लामसलत करून कांचीपुरम येथील बी टेक इन टेम्पल आर्टचे चेन्नई युनिव्हर्सिटीचे पदवी प्राप्त असलेले कांचीपुरम येथील वरदराजन आरमुखम आचार्य यांच्याकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे.विजय वाडा येथील स्टील ग्रे ग्रॅनाईट या दगडातून मंदिराचे बांधकाम करण्याचे योजीले असून या मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झालेली आहे.मंदिर बांधकामासाठी आजतागायात दोनशे टन हून अधिक दगड मागविण्यात आलेले असून वीसहून अधिक कारागिर अहोरात्र दगड घडविण्याचे व नक्षीकाम काढण्याचे काम करत आहेत.

मंदिराचे संपूर्ण बांधकाम अठरा महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मंदिर समितीने ठेवले असून मल्लिकार्जुन मंदिराच्या बांधकाम सेवेत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने वर्गणी देण्याचे आवाहन मंदिर समितीच्यावतीने करण्यात आले आहे.मंदिर बांधकामाच्या देखभालीवर देवस्थानचे अध्यक्ष शिवलिंग स्वामी,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, महेश हिंडोळे,प्रशांत लोकापुरे, सुनील गोरे,बसवराज माशाळे, शिवराज स्वामी, स्वामीनाथ हिप्परगी आदी मंडळी लक्ष ठेवत आहेत.

सढळ हाताने मदत करावी
अक्कलकोटचे ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या जिर्णोद्धरासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्यामुळे महाराष्ट्रातच एक ऐतिहासिक मंदिर होण्याचे अक्कलकोटकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे गर्भगृह शिखर बांधकाम सभा मंडप व कळसा रोहण कार्यक्रम करण्याकामी मल्लिकार्जुन भक्तांनी सढळ हाताने मदत करावे.
– महेश हिंडोळे,माजी नगरसेवक

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!