नाशिक : वृत्तसंस्था
भारत-पाकमधील युद्धसदृश्य स्थितीत प्रत्येक नागरिकही जबाबदारीने वागून यात आपले योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे. भारत-पाक युद्धात सर्वसामान्य जनता आपल्या कर्तव्यावर हजर राहून आपली उत्पादकता वाढवून आपले योगदान देऊ शकते, असे ते म्हणाले.
पाकिस्तानी अतिरेक्यांनी 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला केला. त्यात महाराष्ट्राच्या 6 जणांसह 26 पर्यटक मारले गेले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतर आता दोन्ही देशांत युद्धसदृश्य स्थिती उद्भवली आहे. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उपरोक्त प्रतिपादन केले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, भारतीय सैन्य पाकविरोधात दोन हात करत आहे. पण या स्थितीत भारतीय नागरिकही आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडून आपले योगदान देऊ शकतो. आपण जिथे काम करतो तिथे प्रभावीपणे व मनापासून काम करून तेथील उत्पादकता वाढवली पाहिजे. भारतीय सैन्याला अनेक प्रकारचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी नागरिकांचे हे योगदान महत्त्वाचे ठरेल.
ते पुढे म्हणाले, पहलगाम हल्ल्यात 26 पर्यटकांची हत्या झाली. त्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मिरातील अतिरेकी अड्ड्यांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने अतिशय प्रखर व जबाबदारीने ही कारवाई केली. केवळ अतिरेक्यांना लक्ष्य केले. आता पुढील काही दिवस भारतीय सीमा व देशातील विविध भागांत पाकच्या आगळीकीविरोधात जागरूगता बाळगावी लागेल.
पाक दहशतवाद्यांना खतपाणी घालत आहे. त्यांच्या पाठिशी उभा राहत आहे. त्याची सध्या पुन्हा एकदा प्रचिती येत आहे. पाक अतिरेक्यांच्या कृत्यांच्या समर्थनासाठी व त्यांची पाठराखण करण्यासाठी भारताविरोधात कुरापती करत आहे. अमेरिकेसह विविध देशांनी पाकला समज देण्याचा प्रयत्न केले आहे. पाकने भारतीय सैन्याने अतिरेकी अड्ड्यांवर केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देऊ नये असे अमेरिकेने ठणकावून सांगितले आहे. त्यानंतरही पाक कुरापती करत आहे. पण भारतीय सैन्य पाकला धडा शिकवण्यासाठी सक्षम आहे, असे भुजबळ म्हणाले.