पुणे : वृत्तसंस्था
जगाचे लक्ष बारामतीच्या निवडणुकीकडे लागले असून, बारामतीची जनता जोपर्यंत पाठीशी आहे, तोपर्यंत बारामतीला धक्का लागणे अशक्य आहे, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले. दरम्यान, या सांगता सभेसाठी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा बारामती शहरात पार पडली. या वेळी महाविकास आघाडीचे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, सुनील केदार, फौजिया खान, गुलाब गावंडे, खा. वंदना चव्हाण, आ. रोहित पवार, अशोक पवार, राजे भूषणसिंह होळकर, सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबातील व्यक्ती तसेच घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना खा. शरद पवार म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या जागेवर आज जे सत्तेत सहभागी झाले आहेत, त्यांनी सांगता सभेसाठी जागा दिली नाही. मात्र, याची हरकत नाही. देशातील बेरोजगारी, महागाई, नोकऱ्या, शेतीमालाला हमीभाव या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारला अपयश आले आहे. दरम्यान, या वेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. खरे तर ही विजयाची सभा असून, मतदान करताना गॅस, खताच्या गोणीला नमस्कार करून मतदान करा. या वेळी ‘अजितदादा से बैर नही। लेकीन कमल की खैर नही।’, असा शेर मारला. तर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुत्रीप्रेमामुळेच पक्ष फुटला पण पक्षाकडे मी काय मागितलं होतं? असा सवाल करून माझं काम व मेरिट पाहून मत द्या. दिल्लीची अदृश शक्ती कुटुंबात फूट पाडत असून, नाती तोडण्यासाठी नव्हे तर जोपासण्यासाठी प्रयत्न करायचे असतात, असा टोला अजित पवार यांना लगावला.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओची नक्कल करत भाजप नेते कसे पवारांची बदनामी करतात म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील यांचे व्हिडीओ सभेत दाखवले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुळेंच्या कौतुकाचा व्हिडीओ दाखवून दादा म्हणतात तसं सुप्रियाला मतदान करा, असे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले.