अहिल्यानगर : वृत्तसंस्था
सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपामुळे राज्याचे राजकारण तापले असतांना आता यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावर भाष्य केले आहे. ‘आरोप झाल्यावर मंत्र्यांनी एक क्षणही पदावर राहणे योग्य नाही. हा त्यांचा दोष आहे. मंत्र्यांचे आचरण, विचार शुद्ध असायला हवेत. जीवन निष्कलंक हवे. अपमान सहन करण्याची शक्ती असेल तरच जनता तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे अनुकरण करील,’ असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. अशा व्यक्तींना मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वीच विचार होणे आवश्यक होते, अशा शब्दांत त्यांनी पक्षाच्या प्रमुखांचे कानही टोचले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे तसेच न्यायालयाने शिक्षा ठोठावलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अण्णांनी ही प्रतिक्रिया दिली. पण त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. हजारे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी जनतेसमोर आदर्श ठेवला पाहिजे. समाजाचे नेतृत्व करणारे मंत्रीच जर वाट सोडून चालले तर जनता, राज्य आणि देशाचे मोठे नुकसान होईल. याचा चुकीचे काम करणाऱ्या मंत्र्यांनी विचार करायला हवा, असे हजारे म्हणाले.