मुंबई : वृत्तसंस्था
पालघर जिल्हा शिवसेनाप्रमुख आणि आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. दिघे साहेबांनी पालघरला प्रेम दिल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी काढली. बालेकिल्ला हा बालेकिल्लाच राहिला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत दुसरा-तिसरा कोणी निवडून येता कामा नये. आल्यास जिल्ह्याच्या विकासाला मुकाल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मनोर येथील सायलेंट रिसॉर्टमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
संविधान बदलणार म्हणून लोकांची दिशाभूल केली जात आहे. परंत बाबासाहेबांच्या संविधानावर आपला कारभार सुरू आहे. जब तब सूरज-चांद रहेंगा, बाबासाहेब का संविधान रहेगा. निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव करून बाबासाहेबांना अपमानित करण्याचे काम काँग्रेसने केले. बाबासाहेब सांगायचे काँग्रेस जळते घर आहे. लंडनमधील राहत्या घराचे स्मारकात रूपांतर मोदीजींनी केले. इंदू मिलमध्ये जगाला हेवा वाटेल, असे स्मारक उभे करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कामाच्या जोरावर महायुतीला हरवू शकत नसल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दोन वर्षांत काम उभे केल्याने विरोधक संविधान बदलाच्या अफवा पसरवत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येते का? असा सवाल करून उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आमचा मुख्यमंत्री घरात बसणारा नाही. सर्वसामान्यांची दिवाळी, दसरा आणि गणपतीचा सण गोड झाला पाहिजे. यासाठी आनंदाचा शिधा सुरू केला. दुसऱ्याचा आनंद न पाहणाऱ्यांना दुसऱ्याच्या आनंदाची कल्पना कशी असणार? असेही शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्प बंद पडले होते. बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले, असा दावा त्यांनी केला.
पालघरमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून विकासाचा वेग वाढतोय. कोस्टल रोड विरारपर्यंत आणणार आहोत. त्याचा विस्तार पालघरपर्यंत केला जाणार आहे. पालघरसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार आहोत. राज्य सरकारचा नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून पालघरच्या संपूर्ण भागात मूलभूत सुविधा देण्याचे काम सुरू केल्याची माहिती मख्यमंत्री शिंदे यांनी दिली.