मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील राज्यात जोरदार तयारी करीत असतांना नुकतेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारांना मोठा इशारा दिला आहे.
नाना पटोले म्हणाले कि, काँग्रेसच्या ज्या आमदारांची कामगिरी खराब आहे त्यांचे आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट कापले जाऊ शकते. काँग्रेस तसेच खासगी संस्थांकडून सर्व्हे केले जात असून त्याआधारे पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतले जातील, असा इशारा त्यांनी पक्षाच्या आमदारांना दिला. ज्या काँग्रेसच्या आमदारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस मतदान केले, त्यांना तिकीट देण्यात येणार नाही, असे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने ठरविले आहे. तसेच ज्यांची कामगिरी खराब आहे, त्यांना तिकीट नाकारले जाईल, असे पटोले यांनी सांगितले.
राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे पटोले म्हणाले. काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवनमध्ये मराठा समाजातील लोकांनी भेट घेतली असताना त्यांच्यासमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. आता पुन्हा कोणी भेटणार असतील तर त्यांचेही स्वागत आहे. त्यांच्याशीही चर्चा करू, असेही नाना पटोले म्हणाले. मध्य प्रदेशात भाजपने लाडली बहीण ही योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि सरकार येताच ती बंद केली, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीची काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट यांची बैठक बुधवारी मुंबईत होत आहे. शिवसेनेकडून गेल्या वेळेस जागावाटपाच्या वेळेस शिवसेनेच्या वतीने चर्चेत सहभागी होणार्या संजय राऊत यांना यावेळी चर्चेतून डच्चू देण्यात आला आहे. तीन घटक पक्ष या बैठकीत आपआपले जागांचे दावे या बैठकीत करणार आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सरकारी बंगल्यावर आघाडीच्या जागावाटपाची बैठक बुधवारी दुपारी होणार आहे. या बैठकीला काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात तर शरद पवार गटाकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री अनिल देशमुख हे चर्चेत सहभागी होणार आहेत.