मुंबई वृत्तसंस्था : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदान प्रक्रियेवर गंभीर आरोप करत निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर येत असून, हा प्रकार केवळ शाई पुसण्याचा नसून लोकशाहीच पुसण्याचा असल्याचा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची ‘चोर कंपनी’ हरली असल्यानेच अशा गैरप्रकारांचा आधार घेत असल्याचे त्यांनी म्हटले.
गुरुवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. आम्ही आयोगाला दुबार मतदारांचे गठ्ठेच्या गठ्ठे दिले होते. त्यानंतर आता शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे प्रकार यापूर्वी कधीही झाले नव्हते, असे ते म्हणाले. निवडणूक आयुक्त कशासाठी पगार घेत आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी आयोगावर निष्क्रियतेचा आरोप केला.
उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच टपाली मतदानाच्या पेट्या उघडल्या जात असल्याचाही गंभीर आरोप केला. प्रभाग क्रमांक २०० ते २०६ मधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाच्या दिवशीच दुपारी तीन वाजता टपाली मतदानाच्या पेट्या उघडण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. जोपर्यंत मतदान पूर्ण होत नाही, तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत, हा लोकशाहीतील मूलभूत नियम असून तो मोडला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
संविधान म्हणते मतदान करा, तर निवडणूक आयोग म्हणतो करूनच दाखवा, असा घणाघात करत त्यांनी मुख्यमंत्री आपल्या घरगड्यालाच निवडणूक आयुक्त नेमत आहेत का, असा खोचक सवाल केला. महापालिका निवडणुका नऊ वर्षांनी होत असताना, मतदारयादीत सुधारणा का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
महायुतीकडे कर्तृत्व नसल्याने साम-दाम-दंड-भेदाचा अवलंब केला जात असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांच्या उमेदवारांना कोट्यवधींचे आमिष दाखवण्यात आले. दुबार मतदान, ईव्हीएमचा खेळ, नावावर वेगळाच फोटो अशा तक्रारी आधीच होत्या, आता त्यात शाई पुसण्याचा प्रकार वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीत मतदान केंद्राबाहेर भाजप उमेदवारांच्या नावाच्या पाट्या लावून थेट केंद्र चालवले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेत निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी ठाम मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. अन्यथा लोकशाहीवरील जनतेचा विश्वास पूर्णतः डळमळीत होईल, असा इशाराही त्यांनी दिला.