जळगाव : वृत्तसंस्था
देशातील बजेटनंतर सोन्याच्या किमतीत दिलासा मिळेल अशी अपेक्षा ग्राहकांना होती. मात्र, बजेटनंतरही सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून, यामुळे सोन्याने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
जळगावच्या सुवर्णपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशीही सोने दरात वाढ झाली असून, दुसरीकडे चांदी दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. सध्या सोन्याचे दर जीएसटीसह ८५००० रुपयांच्या वर पोहोचले आहेत.
सोमवारी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळता ८३,२०० रुपयांवर पोहोचला, तर जीएसटीसह हा दर ८५,६९६ रुपये झाला. दुसरीकडे, चांदीचा दर मात्र १००० रुपयांनी घसरला असून, तो ९४,००० रुपये प्रति किलोवर आला आहे.
गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याच्या दरात २१०० रुपयांची वाढ झाली आहे, तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १९०० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. बजेट जाहीर झाल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या प्रति १० ग्रॅमच्या किंमतीत २०० रुपयांची वाढ झाली होती आणि तो दर ८२,९०० रुपयांवर पोहोचला होता. विशेष म्हणजे, यंदाच्या केंद्रीय बजेटमध्ये सोन्याबाबत कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढणार की स्थिर राहणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.