मुंबई वृत्तसंस्था : महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात टाकण्याचा कट रचण्यात आला होता, असा गंभीर आरोप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नितेश राणे यांनी सांगितले की, “खोटे गुन्हे दाखल करून देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्हालाही तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थाने सत्तेचा गैरवापर काय असतो, याचं हे जिवंत उदाहरण आहे. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याचा एककलमी कार्यक्रमच सुरू होता.”
कोरोनाच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर असताना उद्धव ठाकरे सरकारचे नियोजन शून्य होते, असा आरोप करत राणे म्हणाले, “राज्याची घडी विस्कटलेली असताना सरकारने विरोधकांना तुरुंगात टाकण्याचाच उद्योग केला. त्या काळातील कारभाराचा बुरखा आता फाटत चालला आहे.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने काही ठिकाणी शरद पवार गटासोबत युती केल्याबाबतही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची संयुक्त पत्रकार परिषद ही पुणे महापालिका निवडणुकीपुरती मर्यादित आहे. ते संयुक्तपणे निवडणूक लढवत असल्याने जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळा बंद होऊ नयेत, यासाठी आपण ठाम असल्याचे सांगत राणे म्हणाले, “कोकणासाठी वेगळे निकष लावावेत, यासाठी शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. गावागावातील शाळा बंद होता कामा नयेत. मराठवाडा आणि विदर्भासाठी जे निकष आहेत, ते कोकणाला लागू करू नयेत, यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल.”
महायुतीच्या प्रचाराबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “महायुतीच्या प्रचारासाठी एकूण १२ सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून मी राज्यभर जाणार आहे.”