मुंबई : वृत्तसंस्था
उच्चांकीवर पोहोचून मंगळवार, २ एप्रिल रोजी ५५० रुपयांनी घसरण व त्याच दिवशी पुन्हा १५० रुपयांनी वाढ झालेल्या सोन्याच्या भावात बुधवार, ३ एप्रिल रोजी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले. चांदीचे भाव ७६ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
सोमवार, १ एप्रिल रोजी सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ होऊन ते ६९ हजार ४०० रुपयांवर पोहोचले होते. मंगळवार, २ एप्रिल रोजी सकाळी त्यात ५५० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे ते ६८ हजार ८५० रुपये प्रति तोळ्यावर आले होते.
मात्र, दुपारी त्यात १५० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. बुधवार, ३ एप्रिल रोजी त्यात पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले. एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता ७१ हजार ५८५ रुपये मोजावे लागणार आहेत.