ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था

अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतलेय, असं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे देखील फडणवीस म्हणाले. मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सोमवारी मराठी पत्रकार संघातर्फे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते फिनिक्स पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पुरस्काराविषयी बोलताना फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

तुम्ही मला फिनिक्स पुरस्कार दिला म्हणजे मी काही राखेतून उभा राहिलेलो नाही. अनेकवेळा लोकांना वाटलं माझी राख होतेय आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली आहे. ही भरारी मी घेऊ शकलो कारण, मी कधी आव्हानांपासून पळालो नाही, आव्हानांना सामोरा गेलो, आव्हानांचा सकारात्मकतेने सामना केला असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

राख होण्याचा क्षण आला तेव्हा प्रत्येकवेळी सकारात्मकतेने पुढे गेलो. माणसांचा कधी द्वेष केला नाही, माणसं झुंजवली नाहीत किंवा टोकाचं राजकारण केलं नाही, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले आहे, हे बघण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो, असेही त्यांनी म्हटले. आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली त्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यात आलं. मात्र, दोन दिवसांपूर्वी देवाभाऊ नावाची जाहिरात मराठी, इंग्रजी, हिंदी दैनिकांमध्ये देण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करत असतानाचा फोटो आहे. या फोटोवर जाहिरात देणाऱ्याच्या नावाचा कोणताही उल्लेख नाही. यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी टीका करत जाहिरातबाजीबाबत मोठा दावा केला होता. त्यांनी केलेल्या दाव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पण याच जाहिरातीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात मराठा समाजाला न्याय मिळाल्याची बाब अधोरिखेत करण्याचा प्रयत्न झाल्याची देखील चर्चा सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!