मुंबई वृत्तसंस्था : मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाने उमेदवार याद्या जाहीर करून एबी फॉर्मचे वाटप सुरू केले असले, तरी मनसेकडून अद्याप कोणालाही एबी फॉर्म देण्यात आलेला नसल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मनसे किती जागांवर निवडणूक लढवणार, याबाबतही अद्याप ठोस चित्र स्पष्ट झालेले नाही.
या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी संवाद साधत निवडणुकीचे महत्त्व अधोरेखित केले. “ही निवडणूक केवळ महापालिकेची नसून देश, महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईतील मराठी माणसाच्या भवितव्याची आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे डाव आखले जात आहेत. अशा वेळी इतर गोष्टी क्षुल्लक ठरतात,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
मुंबई मराठी माणसाच्या हक्काची असल्याचे सांगत नांदगावकर म्हणाले की, “मुंबई आपल्या हातातच राहिली पाहिजे. मुंबई वेगळी करण्याची स्वप्न पाहणाऱ्यांची स्वप्न उद्ध्वस्त केली पाहिजेत. भांडण आणि वाद बाजूला ठेवून जोशात निवडणूक लढवावी लागेल.” युतीच्या राजकारणावर भाष्य करताना त्यांनी मागील २० वर्षांत प्रथमच मनसे युतीमध्ये निवडणूक लढवत असल्याचे नमूद केले आणि ‘युतीधर्म पाळण्याचा’ निर्धार व्यक्त केला.
राज ठाकरे यांच्या सूचनेचा उल्लेख करत नांदगावकर म्हणाले की, “ही निवडणूक अस्तित्वाची आहे. मराठी माणसासाठी मुंबई वाचवायची आहे. शिवसेना-मनसेचा उमेदवार असेल, त्याला पूर्ण ताकदीने मदत करण्याचा संदेश राज ठाकरे यांनी कोअर टीमला दिला आहे. एनसीपीदेखील सोबत असून, सर्वांनी मिळून प्रचारात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे.”