मुंबई : वृत्तसंस्था
राज्यभर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना अनेक नेत्यांनी या दिवशी आपली भूमिका भाषणातून मांडल्या आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे. संविधानाचा मूळ गाबा कुणालाही बदलता येत नाही. हे कुणाच्याही बापाला शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वंचित बहुजन आघाडीची रविवारी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान महासभा जाली. या सभेद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रावर संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर स्वतः बॅरीस्टर आहेत. त्यामुळे भारतीय संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. संविधानात तशी तरतूद नाही. त्यामुळे संविधान बदलणार हा केवळ एक जुमला आहे. कुणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही.
देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, निवडणुका जवळ आल्या की राज्यात 2 गोष्टी सुरू होतात. काही जण संविधान बदलण्याचा आरोप करतात. तर काहीजण मुंबई तोडण्याचे राजकारण सुरू असल्याचा दावा करतात. हे नेहमीचेच झाले आहे. याऊलट मुंबई कुणी तोडू शकत नाही आणि संविधान कुणी बदलू शकत नाही हेच सत्य आहे.