बीड : वृत्तसंस्था
राज्यात अनेक जिल्ह्यात आज लोकसभा निवडणुकीचे मतदान सुरु असून बीड जिल्ह्यात देखील आज मतदान सुरु आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी देखील आज सकाळी मतदान केले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या कि, माझ्या आयुष्यातील ही पाचवी निवडणूक आहे. त्यामुळे आता संसदेत गेल्यावरच काहीतरी वेगळे वाटेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. मतदान करण्यापूर्वी पंकजा मुंडे यांचे कुटुंबाकडून औक्षण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या, ”माझ्या राजकीय जीवनामध्ये ही पाचवी लोकसभा आहे. यंदा फक्त मी नामनिर्देशन केले एवढाच फरक आहे. प्रीतम मुंडे निवडणुकीला उभ्या होत्या तेव्हा जे कष्ट केले तेच आता सुद्धा केले आहेत. माझ्यासाठी ही पाचवी निवडणूक आहे मात्र मी संसदेत दाखल होईल तेव्हाच काहीतरी वेगळेपण वाटेल”, असे पंकजा म्हणाल्या. पुढे त्या म्हणाल्या, ”400 पारचा नारा पूर्ण होईल का नाही अशी शंका सर्वांना होती. मात्र पंतप्रधान मोदींनी हा नारा दिला आहे तर नक्कीच पूर्ण होईल. गेल्या चार राज्यात झालेल्या निवडणुकीत लागलेला निकाल देखील अनपेक्षित होता. देशातील जनता सुज्ञ आहे. पूर्ण विचारपूर्वक जनता मतदान करणार आणि योग्य सरकार निवडून देईल”, असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केला.
पुढे त्या म्हणाल्या, ”जात आणि धर्म या विषयांच्या पलीकडे जाऊन मतदान करत आलेला बीड जिल्हा पुन्हा एकदा तसंच करेल.. प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगळे आव्हान असते. विविध विषय उभे केले जातात मात्र सत्य लोकांसमोर आहे आणि हे सत्य पडताळूनच जनता मतदान करेल”. याशिवाय मुंडे साहेब होते तेव्हा आम्ही सर्व एकत्र मतदानाला जायचो. मात्र आता ते नसले तरी त्यांचे आशीर्वाद आहेत” असे पंकजा म्हणाल्या.