पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात संगिता भालेराव यांनी चाकणकर यांच्या समर्थकांकडून धमकी मिळाल्याचा आरोप केला आहे. भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असून, धमकी देणाऱ्या संभाषणाची ऑडिओ क्लिपही सादर केली आहे.
संगिता भालेराव यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी फेसबुकवर महिला आयोगाच्या कार्यक्षमतेबाबत टीका केली होती. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सेलच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सोनाली गाडे यांनी त्यांना फोन करून धमकी दिली. या प्रकरणात सोनाली गाडे यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे भालेराव यांनी नमूद केले आहे.
या घटनेनंतर राज्यभरातून चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधकांसह महायुतीच्या नेत्यांनीही त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी महिला आयोगाने पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवर वेळेवर कारवाई केली असती, तर ही घटना टाळता आली असती, असे मत व्यक्त केले आहे.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली थोंबरे यांनीही चाकणकर यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांच्या कार्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि अध्यक्षांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संगिता भालेराव यांच्या तक्रारीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संगिता भालेराव यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
मी महिला म्हणून तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असल्याने वैष्णवी हगवणे-कस्पटेसारख्या घटना मनाला हेलावून टाकतात व त्या संवेदनशीलतेमधून मागणी करणे तसेच त्याबाबत विचारणा करणे हे माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. मी देखील तेवढेच केले होते, तरीही माझ्या अभिव्यक्तीची गळचेपी सोनाली गाडे या व्यक्तीने करण्याचा प्रयत्न केला आहे.
मला धमकावून ती पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रवृत्त केले, तसेच अन्य ठिकाणी सोशल मिडीयावर मला असभ्य शब्द वापरले धमकी देत शिवीगाळही केली. महिलांसाठी सर्वात वाईट समजला जाणारा शब्द म्हणजे वांझोटी अशा शब्दांसारखे अनेक क्रूरता स्पष्ट करणारे व महिला म्हणून मला लज्जा उत्पन्न करणारे अपमानित करणारे शब्दप्रयोग त्यांनी केले असल्याने मला मानसिक त्रास झाला आहे.
तसेच हे सगळं त्यांनी सोशल मीडियामध्ये केले असल्याने माझी बदनामी देखील झाली आहे. त्या एका राजकीय सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी आहेत व त्यांच्या पदाचा त्या गैरवापर करू शकतात असे त्यांनी खुद्द धमकी देत बोलून दाखवले आहे. तसेच, त्यांनी 8379955110 या नंबरवरून मला कंटिन्यू 18 कॉल केलेले असल्याने त्यांच्या डोक्यात किती चीड असेल याचा अंदाज येईल.
त्यासोबतच सोनाली अजित गाडे यांचेवर यापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे सोनाली गाडे व हे ज्यांच्यासाठी केले, त्या रूपाली चाकणकर यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे. त्यामुळे, माझी रूपाली चाकणकर, सोनाली गाडे, स्नेहल चव्हाण यांच्या विरोधात तक्रार आहे, असे संगिता भालेराव यांनी महिला आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसेच, सोनाली गाडे यांच्यासमवेतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील इ-मेलसोबत जोडल्याचे सांगितले आहे.