ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तीन केमिकल पार्क, ग्राम स्वराज उपक्रम जाहीर; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर हल्लाबोल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रमाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे हातमाग, वस्त्रोद्योग, हस्तकला, विणकर आणि कुटीर उद्योगांना चालना मिळणार असून ग्रामीण भागातील गरीब तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा सरकारचा दावा आहे. भारताकडे क्रीडा-संबंधित उत्पादने विकसित करण्याची मोठी क्षमता असल्याचेही अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

यासोबतच देशात तीन मोठ्या केमिकल पार्कची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हातमाग व कुटीर उद्योग क्षेत्र बळकट करण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेला प्राधान्य देण्यात आले असून, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र टीका केली आहे. “देशातील तरुण बेरोजगार आहेत, उत्पादन घटत आहे, गुंतवणूकदार भांडवल काढून घेत आहेत, घरगुती बचतीत मोठी घट झाली आहे आणि शेतकरी संकटात आहेत. तसेच येऊ घातलेल्या जागतिक आर्थिक धक्क्यांकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “हा अर्थसंकल्प धोरणात्मक सुधारणांना नकार देणारा असून, भारताच्या खऱ्या आर्थिक संकटांकडे दुर्लक्ष करणारा आहे. तरुण रोजगार, उत्पादन, शेती आणि गुंतवणूक यासंबंधीच्या गंभीर प्रश्नांना तो हात घालत नाही. त्यामुळे धोरणात्मक सुधारणा आणि टिकाऊ विकासाची संधी गमावली जात आहे.”

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!