कोल्हापूर : वृत्तसंस्था
लग्नानंतरचे कोल्हापूर येथील देवदर्शन उरकून मोहोळ-पंढरपूर महामार्गावरून वडाळ्याकडे निघालेल्या इको कारचा ताबा सुटून कार साइडच्या सिमेंट कठड्यावर आढळून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पोखरापुर गावाच्या हद्दीत पंढरपूर ते मोहोळ येणाऱ्या रोडवर ७ मे रोजी पहाटे घडली. यामधील आठ जखमींवर पंढरपूर आणि सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत जाधव हे त्यांच्या ताब्यातील इको कारने (एमएच १३ ईसी २८१९) पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने जात असताना कारचा ताबा सुटून कडेच्या सिमेंट कठड्याला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात कारमधील सोमनाथ शिवाजी डवरी (वय ४०, रा. वडाळा, ता. उत्तर सोलापूर), रेणुका सुरेश कासार (वय ४५ रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), नवनाथ अनिकेत जाधव (वय ७, रा. कोर्टी, ता. पंढरपूर) हे गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वीच मयत झाले. या कारमधील सीता दिलीप कोष्टी (वय ५५), श्रावणी सुरेश डवरी (वय १६), दिलीप हरीनाथ कोष्टी (वय ६०), महेश दिलीप कोष्टी (वय २४), निकीता महेश कोष्टी (वय १९), आकाश सुरेश जोगी (वय २१, रा. वडाळा), अश्विनी अनिकेत जाधव (वय २५) हे जखमी झाले आहेत.
कारचालक अनिकेत अंकुश जाधव (वय २९, रा. कोर्टी) याच्याविरुद्ध सुरेश शिवाजी डवरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करत आहेत.