नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील राजस्थान राज्यातील कट्टरपंथीय संघटना श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येप्रकरणी दोन हल्लेखोरांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत संयुक्त अभियान राबवत ही कारवाई केली. गोगामेडी यांची गत मंगळवारी दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दुचाकीवरून आलेल्या तीन गुंडांनी गोगामेडी यांच्या घरात घुसून त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती.
राजस्थानची राजधानी जयपूरस्थित श्यामनगर भागात वास्तव्यास असलेले करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या घरी घुसून त्यांची हत्या करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजवरून गोळ्या झाडणाऱ्या दोन हल्लेखोरांची ओळख जयपूरचा रोहित राठोड आणि हरियाणाचा नितीन फौजी अशी करण्यात आली होती. या दोघांची माहिती देणाऱ्यांना पाच लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा करण्यात आली होती. हल्लेखोराच्या मागावर असलेल्या दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थान पोलिसांसोबत संयुक्त अभियान राबवत चंदीगडच्या सेक्टर २२ मधून या दोघांना ताब्यात घेतले. आरोपीसोबत असलेला एक अन्य सहकारी उधम सिंग यालादेखील यावेळी पकडण्यात आले.
बनावट आधाराच्या नावावर ते चंदीगडमध्ये लपून बसले होते. गोगामेडी यांच्या हत्येसाठी हल्लेखोरांना सुपारी देणाऱ्या अन्य एका व्यक्तीला पोलिसांनी शनिवारी जयपूरमध्ये अटक केली होती. सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेंन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गँगस्टर रोहित गोदारा कपुरीसर (गोल्डी बरार) याने स्वीकारली होती.