नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका नियमित सुरु असतांना नुकतेच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात कॉलेज सुटल्यानंतर दुचाकीवरून घरी निघालेल्या तरुणीवर काळाने झडप घातली. दुचाकीच्या चाकात ओढणी अडकल्याने तरुणी अचानक खाली कोसळली. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या टिप्परने तिला चिरडलं. रितीका निनावे (वय २१) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रितीका निनावे ही हिंगणा येथील वाय.सी.सी अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. रितीका बी.ई. इलेक्ट्रॉनिक्स शाखेच्या चौथ्या वर्षात शिकत होती. सोमवारी (४ मार्च) महाविद्यालयाचा स्नेहसंमेलनाचा सोहळा आटोपून ती आपल्या मित्रासोबत दुचाकीवरुन वानडोंगरी परिसरातून घरी जात होती.
त्याचवेळी रितीकाची ओढणी दुचाकीच्या चाकात अडकली. काही क्षणात रितीका जमिनीवर कोसळली. पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने तिला चिरडलं. टिप्परचे मागचे चाक रितीकाच्या अंगावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे हिंगणा- बर्डी मार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती. याप्रकरणी पोलिसांनी टिप्पर चालकाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.