मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. हवामान विभागाने आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. गेल्या काही दिवसांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान होत असून अनेक जिल्ह्यांत वादळी पावसाने तडाखा दिला. राज्यात आता पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर पुण्यातही पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज जळगाव, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे कुठे ऊन तर कुठे पाऊस अशी स्थिती राज्यात निर्माण झाली आहे.