मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुक सुरु झाली असून आता ठाकरे गटाकडून नवीन मशाल गीत लाँच करण्यात आले आहे. तसेच मशाल या चिन्हांमध्ये बदल करून नवीन चीन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे गीत लाँच केले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. ही मशाल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार असा विश्वास यावेळी ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
तर उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, ”शिवसेनेचे नवीन गीत महाराष्ट्राच्या जनतेसमोर सादर केले आहे. अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून मशाल या निशाणीने आमची विजयी सुरुवात झाली. आता सार्वत्रिक निवडणुका आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मशाल हे चिन्ह पोहोचलेले आहे. पण मशाल ही केवळ चिन्ह म्हणून नाही तर, सरकारविरोधात असलेला असंतोष या मशालीच्या रुपाने भडकणार आहे. त्यामध्ये हुकमशाही राजवाट आणि जुमलेबाजी राजवट जळून खाक होईल, असा मला आत्मविश्वास आहे. हुकूमशाहीला ही मशाल भस्म करणार” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
तसेच ”आज शिवसेनेचे गीत जसं सादर केले, तसेच मशालीचे नेमकं चित्र कसं असणार हे देखील तयार केलेले आहे. आगोदरच्या मशाल चिन्हावर आणि आताच्या चिन्हावर फरक आहे. हे मशाल चिन्ही इव्हीएम आणि मतपत्रिकेवर असणार आहे. त्यामुळे मतदारांसमोर जाताना हे चित्र घेऊन जावे असे माझे शिवसैनिकांना आवाहन आहे. आपलं चिन्ह थोडं वेगळं आहे त्यामुळे मतदारांमध्यो कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपलं चिन्ह त्यांना समजलं पाहिजे. त्यामुळे प्रचारादरम्यान याच चिन्हाचा वापर करावा, अशी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना माझं आवाहन आहे” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.