सोलापूर : प्रतिनिधी
पत्नी आणि तिच्या प्रियकराकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहित तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, तिचा प्रियकर, व अन्य दोन अशा चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत इंदापुरे असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन वसंत इंदापुरे (वय ३४, रा. कोटा नगर, जुना विडी घरकुल) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय जनार्दन महांकाळ (रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी), अक्षय ज्ञानेश्वर काडगी (रा. गणेश नगर, पुणे), अस्मिता प्रशांत इंदापुरे (रा. धनकवडी) व ज्ञानेश्वर काडगी (रा. धनकवडी) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आत्महत्या केलेला तरूण प्रशांत याचे अस्मिता हिच्याशी लग्न झाले होते. परंतु लग्नानंतर अस्मिता आणि अक्षय महाकांळ यांच्यात विवाहबाह्य संबंध निर्माण झाले. त्यामुळे अस्मिता प्रशांतला सोडून पुणे येथे राहण्यास गेली. तो तिला आणायला गेला, मात्र आरोपींनी त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून सुटका करून प्रशांत सोलापुरात आला. परंतु त्याच्या मनावर मोठा आघात झाला होता. त्यातून त्याने २१ नोंव्हेबर २०२३ रोजी सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर पोलिसांना प्रशांत जवळ मिळालेल्या चिठ्ठीतून हा उलगडा झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सपोनि चौधरी करत आहेत.