तुळजाभवानीमुळे ऊस उत्पादकांची वणवण आता थांबेल : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचे प्रतिपादन ; कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळा उत्साहात
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.११ : उसाच्या गाळपासाठी कायम पायपीट करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांची वणवण आता संपेल. त्यांच्या हक्काचा तुळजाभवानी कारखाना सुरू झाल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळेल,असा विश्वास माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केला.
नळदुर्ग (ता.तुळजापूर)येथील श्री तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते. धोत्रीच्या गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने हा कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला आहे. गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रीती शिंदे तसेच बाबुराव चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सुष्माताई , सुनील चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शुभांगी या दांपत्याच्या हस्ते होम हवन आणि विधिवत पूजा करण्यात आली.उस्मानाबाद जनता बँकेचे माजी चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, गोकुळ शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे ,कार्तिक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी चेअरमन दत्ता शिंदे यांनी गळीत हंगामाची माहिती दिली. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, सुनील चव्हाण यांनी सहकार्य केल्यामुळेच तुळजाभवानीचा भोंगा वाजू शकला . सेवेची ही संधी शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरू,असे सांगितले.
दरम्यान गोकुळ शुगरने आतापर्यंत तीन लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. साखर उतारा जिल्ह्यात अव्वल असून शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस पुरवल्यामुळे शक्य झाले.१६ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्यांच्या बँक खात्यात ऊस बिलाचा पहिला हप्ता प्रति टन दोन हजार रुपये प्रमाणे जमा करण्यात आला आहे. तोडणी आणि वाहतूक यंत्रणांच्या रकमा त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आल्या आहेत , अशी माहिती गोकुळच्यावतीने शिंदे यांनी दिली.कार्यक्रमास अभिजीत गुंड युवा नेते अभिजीत चव्हाण रणवीर चव्हाण , चीफ इंजिनीयर धनंजय दानाई यांच्यासह कारखान्याचे अधिकारी , कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.
दीड लाख गाळपाचे उद्दिष्ट
उशिराने गाळप सुरू होत असले तरी कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र चांगले आहे. गाळपाची यंत्रणा उत्तम आहे. त्यामुळे मार्चअखेर पर्यंत गळीत हंगाम सुरू राहील.यंदा हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे नियोजन आहे – दत्ता शिंदे,चेअरमन गोकुळ शुगर