नाशिक वृत्तसंस्था : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे. महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी बडे नेते मैदानात उतरले असून शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दररोज विविध ठिकाणी सभा घेत आहेत. निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले असतानाच, आता प्रचाराच्या ऐन काळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे.
नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक आणि माजी महापौर दशरथ पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. ठाण्यातील ‘शुभ दीप’ या शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे शिवसेनेत स्वागत करत पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अशोक मुर्तडक हे मनसेची सत्ता असताना नाशिकचे महापौर होते. काही काळापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर दशरथ पाटील हे शिवसेना फुटण्यापूर्वी महापौर होते आणि नंतर त्यांनीही भाजपची वाट धरली होती. अशोक मुर्तडक यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपकडे उमेदवारी मागितली होती. मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून राजकीय समीकरणे बदलली आहेत.
दुसरीकडे, माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील हे आधीपासूनच शिवसेनेत सक्रिय असून शिवसेनेने त्यांना प्रभाग क्रमांक ९ मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दशरथ पाटील शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा होती. अखेर आज त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
या दोन अनुभवी आणि प्रभावशाली नेत्यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.